अहिल्यानगर : कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या भागातील ऊस हिरडगावच्या गौरी शुगरला नेण्यात यावा आणि या भागात शेतकी कार्यालय सुरू करावे, अशी मागणी शेतकरी बचाव कृती समितीच्या माध्यमातून केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत गौरी शुगरचे व्यवस्थापकीय संचालक रोहिदास यादव यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यानंतर तत्काळ निर्णय घेतला आणि खेड येथे शेतकी कार्यालय सुरू करण्यात आले. गौरी शुगरच्या खेड येथील या शेतकी कार्यालयाचे उद्घाटन यादव यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. आमची स्पर्धा आमच्याशीच आहे, अशी भूमिका मांडत उसाचे कोणत्याही काट्यावर वजन करा, असे सांगणारा गौरी शुगर हा पहिलाच कारखाना ठरला आहे.
यावेळी व्यवस्थापकीय संचालक रोहिदास यादव म्हणाले की, अडचणींचा डोंगर पार करत ‘गौरी शुगर’ ची नव्याने उभारणी झाली. लोकांनी आमच्यावर अपार विश्वास दाखवला. त्या विश्वासास उतराई होण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहिलो. कारखाना प्रशासन म्हणून ऊस उत्पादकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी कोणतीही कसर ठेवलेली नाही. ओंकार ग्रुपमुळे आज शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव ठेवत योग्य न्याय देण्याचे श्रेय ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बोत्रे पाटलांना जाते. चांगल्या सूचना दिल्यास त्या निश्चितपणे अमलात आणू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी शेतकरी नेते महादेव मोरे, धनंजय मोरे, भाजप तालुकाध्यक्ष सुनील काळे, रवींद्र पाडुळे आदींनी मनोगतात कारखाना प्रशासनाचे आभार मानले. राहुल ढवाण यांनी प्रास्ताविक केले. विजयकुमार कायगुडे यांनी सूत्रसंचालन केले. सतीश महाराज मोरे यांनी आभार मानले.











