सांगली : काही अज्ञात व्यक्तींनी गुरुवारी मध्यरात्री जत तालुक्यातील तिप्पेहळ्ळी येथील राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे नाव बदलल्याची घटना घडली. कारखान्याच्या प्रवेशद्वारावरील कमानीवर ‘राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना’ अशा नावाचा फलक लावण्यात आला. तेथील राजारामबापू पाटील साखर कारखाना हे नाव काढून टाकण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश गणपती पाटील (वय ५९, रा. कारखाना कॉलनी, जत) यांनी फिर्यादी दिली आहे. शुक्रवार अज्ञात व्यक्तीने कारखान्याच्या स्वागत कमानीवर अनधिकृतरीत्या फलकावर नवे नाव चिकटवून नुकसान केल्याचे यात म्हटले आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांना भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे टार्गेट करीत आहेत. जतमधील साखर कारखान्यावरून त्यांनी पाटील यांच्यावर टीका केली होती. जतचा साखर कारखाना सभासदांना देऊन टाका, अन्यथा मी जत तालुक्यातील राजारामबापू पाटील सहकारी साखर : कारखाना युनिट क्रमांक चारचे धुराडे पेटू देणार नाही, मोठा संघर्ष करायची माझी तयारी आहे’, असा इशारा दिला होता. त्यातच आता साखर कारखान्याचे नाव बदलल्याने वाद निर्माण झाला आहे. राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या फलकावर ‘राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना’ असे नाव कोणी लिहीले याचा पोलिस शोध घेत आहेत.











