डेहराडून : आगामी गाळप हंगाम सुरू करण्यासाठी साखर कारखान्यांची दुरुस्ती आणि देखभालीची कामे ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावीत. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नादेही आणि बाजपूर साखर कारखाने सुरू केले जातील आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात किच्छा आणि डोईवाला साखर कारखाने सुरू करण्याचा निर्णय ऊस विकास आणि साखर उद्योग विभागाचे मंत्री सौरभ बहुगुणा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. गळीत हंगामादरम्यान तांत्रिक अडचणी येणार नाहीत याची दक्षता घ्यावी अशी सूचना करण्यात आली. गाळप हंगामात साखर कारखान्यांनी ऊसाच्या किमतीच्या किमान ६५ टक्के रक्कम स्वतःकडील द्यावी असे सांगण्यात आले.
राज्यातील साखर कारखान्यांसाठी आगामी २०२५-२६ चा गाळप हंगाम सुरू करण्यासाठी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी सचिवालय संकुलातील एफआरडीसी सभागृहात बैठक झाली. यावेळी ऊसविकास व साखर उद्योग विभागाचे अतिरिक्त सचिव प्रकाश चंद्र दुमका, ऊस आयुक्त त्रिलोक सिंग मार्टोलिया, उत्तराखंड शुगर्सचे महाव्यवस्थापक, सर्व साखर कारखान्यांचे मुख्य व्यवस्थापक, कार्यकारी संचालक आणि सर्व विभागप्रमुख आढावा बैठकीत सहभागी झाले होते. आगामी गाळप हंगामासाठी साखर कारखान्यांना देण्यात आलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कार्य आराखडा तयार करावा, कारखान्यांच्या क्षमतेनुसार उसाची उपलब्धता सुनिश्चित करावी अशी सूचना मंत्र्यांनी केली.











