लातूर : चालू गळीत हंगामात गाळपासाठी ट्वेंटीवन शुगर्स कारखान्याने उसाला प्रतिटन ३,१५१ रुपये दर देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी घोषणा कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी दिली. कारखान्याच्या पाचव्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्नि प्रदीपन कार्यक्रमात ते बोलत होते. मागच्या गळीत हंगामातील गाळप ऊसाला ट्वेंटीवन शुगर्सने अंतिम ऊसदर प्रतिटन ३ हजार एक रुपये एवढा विक्रमी भाव दिला. मागील गळीत हंगामातील अंतिम ऊस बिलाची रक्कम दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर उत्पादकांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. कमीत कमी खर्चात अधिकाधिक उत्पादन घेऊन शेतकऱ्यांच्या कष्टाला अधिकचा मोबदला मिळावा असा प्रयत्न सुरू आहे असे ते म्हणाले.
यंदाच्या गळीत हंगामात मांजरा परिवाराने जाहीर केलेल्या संकल्पानुसार शेतकऱ्यांच्या ऊसाला प्रतिटन ३,१५१ रुपये भाव देण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वांनी जिद्दीने प्रयत्न करावेत, असे आवाहन अमित देशमुख यांनी यावेळी केले. ट्वेंटीवन ॲग्री लिमिटेडच्या संचालक अदिती अमित देशमुख उपस्थित होत्या. अवीर देशमुख यांच्या हस्ते विधिवत बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा पार पडला. सोहळ्यास ट्वेंटीवन शुगरचे उपाध्यक्ष विजय देशमुख, सरव्यवस्थापक संतोष बिरादार, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे उपाध्यक्ष समद पटेल, ऋषिकेश पाटील, राजकुमार पाटील, बळवंत पाटील, शंकर बोळंगे आदींसह सर्व खातेप्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












