कोल्हापूर : राज्यातील ऊस गळीत हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. मात्र, हंगामाच्या तोंडावर जिल्ह्यात अवकाळी पावसाने दाणादाण उडवून दिली आहे. या पावसामुळे साखर हंगाम किमान पंधरा दिवस लांबण्याची भीती व्यक्त होत आहे. या आधी झालेल्या पावसामुळे ऊसपिकांत अद्यापही पाणी साचून आहे, तोपर्यंत गेल्या दोन दिवसांपासूनच्या पावसाने मोठ्या प्रमाणात पिके पाण्याखाली आहेत. काही कारखान्यांच्या टोळ्या कार्यक्षेत्रात दाखल झाल्या. काही कारखान्यांनी ऊस तोडीचे नियोजनही दिले आहे. त्यानुसार ऊस तोडण्याची तयारी सुरू असताना अवकाळी पावसाने या सर्व नियोजनांवरही पाणी फिरवले आहे. आता ऊस तोडणे अशक्य आहे. किमान आणखी पंधरा दिवस पावसाने विश्रांती घेऊन कडक ऊन पडले तरच ऊस तोडीला घात येण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील कारखान्यांनी दसरा, दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर गव्हाणीत मोळी टाकून प्रारंभ केला, पण आता प्रत्यक्ष गाळपासाठी उसाची प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नाही. शेजारील कर्नाटक राज्यात २० तारखेपासून गाळप हंगाम सुरू झाला आहे. त्याचा फटका सीमावर्ती भागातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील कारखान्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यातच गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोल्हापूरसह सांगलीत अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे कारखानदारही हवालदिल झाले आहेत. ऊस दरासाठी होणाऱ्या आंदोलनाचाही अडथळा हंगामासमोर असेल. ‘स्वाभिमानी’ने गळीत हंगामात पहिली उचल प्रतिटन ३७५० रुपये देण्याची मागणी केली आहे. त्यावरून आंदोलन झाल्यास पुन्हा हंगाम लांबण्याची भीती राहील.









