पुणे : ऊस तोडणीसाठी प्रति टनाला पाचशे रुपये असलेला दर दोनशे रुपयांनी वाढवून ७०० रुपये करावा, शासन आदेशानुसार ऊस तोडणी मशिनमालक व वाहतूकदार यांच्या बिलातून ऊस पाचट कपात करू नये आणि ऊसतोडणी दरासंदर्भात त्रिस्तरीय समिती स्थापन करावी, या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. याबाबत तत्काळ निर्णय न झाल्यास शनिवार (दि. १ नोव्हेंबर) पासून राज्यातील ऊसतोडणी मशिनमालक हे ऊसतोडणीच्या कामकाजात सहभागी होणार नाहीत, असा इशारा महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी मशिनमालक संघटनेने दिला आहे.
सोमवारी (दि. २७) संघटनेचे सचिव अमोलराजे जाधव यांच्या नेतृत्वाखाली प्रदीप अहिरेकर, शिवानंद मुगळे, लालासाहेब कदम, अवधूत सपकाळ, विनोद सूर्यवंशी, सुनील चव्हाण, योगेश शिवले आदींसह राज्यभरातील संघटनेच्या सभासदांनी साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांची दुपारी भेट घेतली आणि आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करीत मागण्यांवर तोडगा काढण्याबाबतची विनंती केली. त्या वेळी साखर आयुक्तांनी आंदोलन करू नका, या प्रश्नात मी लक्ष घालतो, असे आश्वासन दिले आहे.
बैठकीनंतर दै. ‘पुढारी’शी बोलताना अमोलराजे जाधव म्हणाले, ऊसतोडणीचा दर हा वाढून आम्हाला ७०० रुपये प्रतिटन मिळावा, ही आमची प्रमुख मागणी आहे. तसेच सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचा शासन निर्णय दि. १२ ऑक्टोबर २०२२ नुसार ऊसतोडणी यंत्राने (हार्वेस्टर) तोडलेल्या उसाच्या वजनातून सरसकट ४.५ टक्के पाचटाचे वजन वजावट करण्यास शासन निर्णयाने मान्यता दिली आहे. हा शासन निर्णय हा शेतकऱ्यांच्या उसाचे तोडणी व वाहतूक अंतर्गत उसाचे वजन वजावट करण्यासंदर्भात आहे. त्यामुळे ऊसतोडणी यंत्रधारकांच्या बिलातून पाचटासाठी कोणतीही कपात करण्यात येऊ नये, अशा सूचना सर्व साखर कारखान्यांना देण्यात येतील, असे संघटनेस साखर संचालक डॉ. केदारी जाधव यांनी पत्र दिले आहे.
ऊस पाचट वजावट ही मशिनमालकांकडून करू नये, असा शासन निर्णय जाहीर केला आहे. पण, साखर कारखाने त्याला दाद देत नाहीत. ऊस पाचट वजावट ही साडेचार टक्क्यांच्या आसपास आहे. त्यामुळे या मागण्यांवर जर तत्काळ निर्णय झाला नाही तर संघटना १ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या यंदाच्या ऊस गाळप हंगामात आपल्या ऊसतोडणी मशिन बंद ठेवतील आणि तोडणीच्या कामकाजात सहभागी होणार नाहीत, असे स्पष्ट सांगितले आहे. राज्यात सुमारे अडीच हजार ऊसतोडणी मशिनयंत्रे कार्यरत आहेत. तर, साधारणतः १८० ते २०० लाख मेट्रिक टन उसाची तोडणी ही यंत्राद्वारे होते, असेही जाधव म्हणाले.









