सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या गळीत हंगामास सुरवात होत आहे. गेल्या काही दिवसांपासून बहुतांश साखर कारखान्यांनी मोळीपूजन कार्यक्रम उरकला आहे. प्रत्यक्षात गाळप येत्या शनिवारी, दि. १ पासून सुरू होणार आहे. जिल्ह्यातील ४० पैकी ३३ कारखान्यांनी गाळप परवान्यांसाठी अर्ज सादर केला आहे. यामध्ये गेल्या हंगामात शेतकऱ्यांचे पैसे थकवलेल्या चार कारखान्यांचाही समावेश आहे. तर बंद असलेला मकाई, संतनाथ, स्वामी समर्थ यासह संत शिरोमणी, भीमा सहकारी, मातोश्री आणि इंद्रेश्वर कारखान्यांनी अद्यापही गाळप परवाना मागितला नाही.
जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ३३ कोटी रुपये थकीत आहेत. यंदाच्या गाळप हंगामासाठी जिल्ह्यात २ लाख १२ हजार हेक्टर क्षेत्रावरील ऊस तोडणीसाठी उपलब्ध आहे. जिल्ह्यात सध्या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात ऊस तोडणी मजूर दाखल होण्यास सुरवात झाली आहे. वाहनधारक ऊस तोडणी टोळ्यांची जमवाजमव करत असताना दिसून येत आहेत. त्याचबरोबर यंत्राद्वारे ऊस तोडणी करणारे ठेकेदारही अंतिम टप्प्यात तयारी करत आहेत. समाधानकारक पावसामुळे यावर्षी जिल्ह्यातील कारखान्यांना मुबलक प्रमाणात ऊस उपलब्ध आहे. मात्र, पाऊस लांबल्याचा फटका या हंगामाला बसण्याची शक्यता आहे. सीना नदी काठावरील उसाला मोठा फटका बसला आहे. तोडणी हंगाम सुरू करताना सर्वच घटकांना कसरत करावी लागणार आहे. पावसामुळे कारखाना प्रशासन, ऊस तोडणी वाहतूक करणारी वाहने, ऊस तोडणी मजूर व शेतकरी यांची तारांबळ उडणार आहे.









