पुणे : राज्यात यंदा सुमारे १०४४ ते १२६४ लाख मेट्रिक टन उसाचे उत्पादन अपेक्षित असल्याचा निष्कर्ष कृषी विभाग आणि मिटकॉन संस्थेच्या संयुक्त ऊस गाळपाच्या संभाव्य अंदाजानंतर पुढे आला आहे. त्यातून प्रत्यक्षात कारखान्यांना गाळपासाठी ९४० ते १०३७ लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. त्यातून इथेनॉलकडे २० लाख मेट्रिक टन साखर जाणे अपेक्षित आहे. त्यानंतर राज्यात ८५ ते ९६ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन हाती येण्याचा अंदाज आहे. राज्यात यंदाच्या २०२५ – २६ च्या ऊस गाळपास १ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे.सद्यःस्थितीत क्षेत्रीय स्तरावर २१४ साखर कारखान्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.
आगामी दोन दिवसांत साखर आयुक्तालयाकडून हे गाळप परवाने वितरीत केले जातील. गाळपासाठी परवाने प्रस्ताव प्राप्त झाले असले तरी प्रति मे. टनास २७ रुपये ५० पैसे ही रक्कम कपात करून किती कारखान्यांनी ती जमा केली आहे, कारखान्यांचे किती परिपूर्ण प्रस्ताव प्रादेशिक साखर सहसंचालकांकडून रक्कम भरल्यानंतर अंतिम छाननीसाठी आयुक्तालयात आले, याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. साखर आयुक्तालयातील प्राप्त माहितीनुसार, सहकारी १०७ आणि खासगी १०७ मिळून २१४ साखर कारखान्यांकडून गाळप होईल अशी माहिती देण्यात आली. दरम्यान, यंदा मुख्यमंत्री सहाय्यता निधी ऊस गाळपावर प्रति मे. टन १० रुपये, पूरग्रस्त निधी ऊस गाळपावर प्रति मे. टन ५ रुपये, गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ निधी प्रतिटन १० रुपये, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट निधी प्रति मे. टन १ रुपया, राज्य सहकारी साखर कारखाना संघ प्रति मे. टन १ रुपया, साखर संकुल देखभाल व दुरुस्ती निधी प्रति मे. टन ५० पैसे अशी एकूण २७ रुपये ५० पैसे कपात होणार आहे.












