कोल्हापूर : बिद्री कारखान्याकडून ३४५२ रुपये पहिली उचल देण्याची अध्यक्ष के. पी. पाटील यांची घोषणा

कोल्हापूर : गेल्या काही वर्षांपासून रासायनिक खते, औषधे, इंधन आदींचे दर प्रचंड वाढले असून, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे साखरेचा हमीभाव वाढवणे आणि शेतकऱ्यांच्या उसास योग्य दर देणे काळाची गरज आहे. त्यामुळे दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने २०२५-२६ या गळीत हंगामासाठी प्रतिटन ३४५२ रुपये विनाकपात पहिली उचल देण्यात येणार आहे, अशी घोषणा कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के. पी. पाटील यांनी केली. हा अंतिम ऊस दर नाही. हंगामात यापेक्षा देखील उच्चांकी दर दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

कारखान्याच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष पाटील म्हणाले की, चालू गळीत हंगामासाठी बिद्री साखर कारखान्याची तोडणी वाहतूक यंत्रणा सज्ज झाली असून, कार्यक्षेत्रातील गावागावांत मजूर टोळ्या व ऊसतोडणी यंत्रे दाखल झाली आहेत. विस्तारीकरणानंतर कारखाना प्रतिदिन ८ हजार ५०० मेट्रिक टन क्षमतेने ऊस गाळप करण्यास सज्ज झाला आहे. शेतकऱ्यांना उच्चांकी दर देण्याची परंपरा कारखान्याने कायम ठेवली आहे. या हंगामात गाळपास येणाऱ्या उसास प्रतिटन ३४५२ रुपयांप्रमाणे विनाकपात पहिली उचल देण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. कारखाना व्यवस्थापनाने ठरवलेले १० लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस कारखान्याकडे गाळपासाठी पाठवावा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष मनोज फराकटे, संचालक, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, कार्यकारी संचालक एस. एन. घोरपडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here