मुंबई : यूएस फेडरल रिझर्व्हच्या भविष्यातील व्याजदर कपातीबाबत स्पष्टता नसल्याने गुंतवणूकदारांच्या भावनांना धक्का बसल्याने गुरुवारी इक्विटी बेंचमार्क खाली स्थिरावले. नवीन परदेशी निधी बाहेर पडण्याचाही बाजारावर परिणाम झाला. सेन्सेक्स ५९२.६७ अंकांनी घसरून ८४,४०४.४६ वर बंद झाला, तर निफ्टी १७६.०५ अंकांनी घसरून २५,८७७.८५ वर बंद झाला. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स कंपनी, सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज, भारती एअरटेल आणि टाटा स्टील हे निफ्टी पॅकमधील शेअर घसरले.
यूएस फेडरल रिझर्व्हने आपला प्रमुख व्याजदर २५ बेसिस पॉइंटने कमी केला. तथापि फेड अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी सूचित केले की अमेरिकेतील चालू सरकारी शटडाऊन दरम्यान नवीन आर्थिक डेटा उपलब्ध नसल्यामुळे नजीकच्या काळात धोरणात्मक सवलतींमध्ये आणखी घट होण्याची शक्यता नाही. पॉवेल यांच्या सावध भूमिकेमुळे अमेरिकेच्या बाजारात काहीशी पडझड पहायला मिळाली. त्याचा परिणाम भारतीय बाजारावरही दिसून आला. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) बुधवारी इक्विटी मार्केटमध्ये २,५४०.१६ कोटी रुपयांचे शेअर्स विकले. त्यामुळे प्रमुख निर्देशांकांवर परिणाम झाला. बाजारातील अस्थिरतेचे मापन करणारा इंडिया VIX १.५ टक्क्यांनी वाढून १२.१६ वर पोहोचला.












