सोलापूर : आलेगाव बुद्रुक (ता. माढा) येथील राजवी ॲग्रो पॉवर प्रा. लि. हा साखर कारखाना यंदाच्या गाळप हंगामात ३००१ रुपये प्रति मेट्रिक टन ऊसदर देणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव सावंत यांनी गाळप हंगाम प्रारंभाप्रसंगी गुरुवारी (ता. ३०) सांगितले. प्रा. सावंत म्हणाले, भैरवनाथ शुगर कारखान्याचे विभाजन झाले आहे. माढा तालुक्यातील आलेगाव येथील कारखाना आता राजवी ॲग्रो प्रा. लिमिटेड या नावाने चालवला जाणार आहे. मागील वर्षी कारखान्याने २८०० रुपये प्रतिटन दर दिला होता. यंदाही शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल व्हावा, शेतकऱ्यांच्या हातामध्ये थोडे पैसे मिळावेत या भावनेतून यावर्षी कारखाना ३००१ रुपये इतका दर देणार आहे. ऊस गाळपास आल्यापासून १० ते १२ दिवसांत उसाचे बिल अदा केले जाईल.
पहिला हप्ता २८०० रुपये, दुसरा हप्ता बैल पोळ्याला १०० रुपये व दिवाळीला १०१ रुपये दर देण्यात येणार आहे. कारखान्याने जवळचा ऊस गाळपास आणताना वाहतूक ठेकेदारांना आर्थिक भार बसू नये म्हणून १ ते ३० किलोमीटरपर्यंत ३० किलोमीटरचा दर तर २१ ते ४० किलोमीटरपर्यंत ४० किलोमीटरचा दर देण्याचा निर्णय घेतल्याचे शेती विभागाचे राजाभाऊ खटके यांनी सांगितले. यावेळी धनश्री पतसंस्थेचे चेअरमन शिवाजीराव काळुंगे, कारखान्याचे उपाध्यक्ष पृथ्वीराज सावंत, मुन्ना साठे, संजय पाटील- भीमानगरकर यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी कालिदास सावंत, संजय पाटील भीमानगरकर, बंडूनाना ढवळे आदींसह शेतकरी उपस्थित होते.


