अहिल्यानगर : पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने कार्यान्वित केलेल्या नव्या प्रकल्पाच्या उभारणीबद्दल संचालक मंडळ अभिनंदनास पात्र आहेत. हा नवीन प्रकल्प सहकार चळवळीला नवी दिशा देणारा ठरणार आहे. त्यातून कारखाना यंदाच्या गळीत हंगामात प्रतिदिन १७ ते १८ हजार मेट्रिक उसाचे गाळप करून गाळपाचा नवा उच्चांक निर्माण करेल, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. कारखान्याच्या ७६ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ विखे पाटील यांच्या हस्ते आणि महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे संचालक आणासाहेब म्हस्के पाटील होते.
मंत्री विखे-पाटील म्हणाले की, निळवंडे धरणाचे पाणी लाभक्षेत्रात आल्याने उसाच्या क्षेत्रात देखील मोठी वाढ होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सहकार मंत्रालयामुळे सहकार चळवळीला मोठा आधार मिळाला. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्यासारख्या अनुभवी नेतृत्वाकडे सहकार मंत्रालयाची जबाबदारी असल्यामुळेच सहकारी साखर कारखानदारीच्या बाबतीत केंद्र आणि राज्य सरकारचे धोरण सकारात्मक आहे. कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रास्ताविक केले. महंत उद्धव महाराज मंडलिक आणि माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील, पंचायत समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, ट्रक वाहतूक सहकारी संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर राठी, प्रवरा बँकेचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे, शिवाजीराव जोंधळे, सोपान शिरसाठ, अंबादास पिसाळ, महेश कोनापुरे आदी उपस्थित होते.


