बेळगाव : उगार साखर कारखान्यामध्ये येत्या ४८ व्या ऊस गळीत हंगामासाठी सर्व कामे पूर्ण झाली आहेत. कारखान्याचा ऊस गळीत हंगाम लवकर सुरू होणार आहे. आतापर्यंत ऊस उत्पादकांना चांगला दर दिला आहे. कारखाना येत्या ऊस गळीत हंगामात सुमारे २१ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करणार आहे, अशी माहिती कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक चंदन शिरगावकर यांनी दिली. कारखान्याच्या बॉयलर अग्नि प्रदीपन कार्यक्रमात ते बोलत होते.
चंदन शिरगावकर म्हणाले, गाळपाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कारखाना प्रयत्नशील आहे. ऊस बागायतदारांनी आपला ऊस कारखान्यात पाठवून सहकार्य करावे. यावेळी संचालक उद्योजक प्रफुल शिरगांवकर यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन झाले. व्यवस्थापकीय संचालक उद्योगपती चंदन शिरगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यवस्थापक बी. एन. अकिवटे यांनी पूजा केली. यावेळी परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.












