नाशिक : कादवा साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू, आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचे आवाहन

नाशिक : कादवा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासह मान्यवरांचे हस्ते उसाची मोळी टाकून गुरुवारी (ता. ३०) करण्यात आला. अध्यक्षस्थानी कादवा कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे होते. आमदार दिलीप बनकर, खासदार भास्कर भगरे, मविप्रचे सरचिटणीस नितीन ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय पाटील, जिल्हा बँकेचे माजी संचालक गणपतराव पाटील, बाजार समितीचे अध्यक्ष प्रशांत कड आदी उपस्थित होते. यावेळी सातत्याने होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती संकटात येत आहे. मात्र ऊस शाश्वत पीक आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी ऊस लागवड करून कादवा कारखान्याला ऊस पुरवठा करावा. प्रत्येक सभासदाने ऊस लागवड केलीच पाहिजे असे आवाहन मंत्री झिरवळ यांनी केले.

कार्यक्रमात कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी कादवाच्या प्रगतीचा आढावा घेताना ‘उत्पादनवाढ ही आजची गरज असून शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान व एआयचा वापर करून एकरी उत्पादन वाढविण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, प्रत्येक सभासदाने ऊस लागवड करावी. आगामी काळात कमी दिवसात जास्त गाळप करण्यासाठी विस्तारीकरण करणे आवश्यक असून त्यादृष्टीने तयारी सरू आहे. सीएनजी प्रकल्पही सुरु करण्याचा मानस आहे. खासदार भगरे, ठाकरे, कामगार युनियनचे अध्यक्ष भगवान जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. सदाशिव शेळके, संजय पडोळ, अशोक वाघ, विश्वासराव देशमुख, अनिल देशमुख, कैलास मवाळ गंगाधर निखाडे, चेअरमन शिवाजी बस्ते तसेच कारखान्याचे संचालक सभासद शेतकरी कामगार उपस्थित होते. संचालक रावसाहेब पाटील यांनी स्वागत केले. संचालक सुखदेव जाधव यांनी आभार मानले. अशोक शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here