कर्नाटकमध्येही ऊस दर आंदोलन पेटले, बेळगावात निपाणी-मुधोळ राज्य महामार्गावर ठिय्या

बेळगाव : महाराष्ट्रात शेतकरी संघटनांचे उसाच्या पहिल्या हप्त्यासाठी आंदोलन सुरू असतानाच उत्तर कर्नाटकातही शेतकरी संघटनांनी जोरदार आंदोलन सुरू केले आहे. यंदा उसाला प्रति टन ३५०० रुपये दर जाहीर करून ऊस तोडणी सुरू करावी, या मागणीसाठी विविध शेतकरी संघटना एकवटल्या आहेत.निपाणी-मुधोळ महामार्गावर गुर्लापूरजवळ शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. ३५०० रुपये प्रति टन दर दिला पाहिजे, अशी मुख्य मागणी शेतकऱ्यांची आहे. शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष चुनाप्पा पुजारी, शशिकांत पडसलगी यांच्या नेतृत्वाखाली विविध जिल्हा, तालुका पातळीवर शेतकरी संघटना यामध्ये सहभागी झाल्या आहेत. याशिवाय विविध मठांचे स्वामी, आजी-माजी सैनिक संघटना, वकील संघटना, शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थीही आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा देत आहेत. राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

महाराष्ट्रातील कारखाने ३४०० वर दर देत आहेत. मग कर्नाटकला का परवडत नाही. आम्ही हे खपवून घेणार नाही. आंदोलन आणखी तीव्र केले जाईल,असे रयत संघटनेचे प्रकाश नाईक यांनी सांगितले. महाराष्ट्रातही दरप्रश्नी विविध संघटनांचे आंदोलन सुरू आहे. तसेच ठिकठिकाणी पाऊसही सुरू आहे. यामुळे सीमाभागातील महाराष्ट्र हद्दीतील कारखाने अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झाले नाहीत. दरवर्षी कर्नाटकचे कारखाने अगोदर सुरू होतात. उसाची पळवापळवी होते. यंदा सीमाभागातील कारखाने आंदोलकांनी बंद केल्याने मात्र तिकडे होणारी ऊस वाहतूक टळली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here