छत्रपती संभाजीनगर : आई-वडील सुनील राठोड आणि गीताबाई राठोड हे ऊसतोड करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. अशा प्रतिकूल परिस्थितीतही कृष्णाने जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर जामडी-घाट तांडा (ता. कन्नड) येथील ऊसतोड मजुराचा मुलगा कृष्णा राठोड याने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले. कृष्णा राठोड यांच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. त्यांचे आई-वडील आजही कृष्णाच्या शिक्षणाचा खर्च भागवतात. त्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.
कृष्णा यांनी गावातच पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. कला शाखेतून बीए पदवी प्राप्त केली. २०२१ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. अनेक अडचणींना सामोरे जात २०२५ साली राज्यसेवा परीक्षेतील यश मिळवले. कृष्णा म्हणाले की, वडिलांच्या कष्टामुळे आज मी या टप्प्यावर पोचलो. त्यांनी माझ्यासाठी केलेल्या ऊसतोडीचे कष्ट मला या यशापर्यंत घेऊन आले. हे यश माझे नसून माझ्या कुटुंबाचे आहे. मी कठीण प्रसंगातही हार मानली नाही.












