धाराशिव : जिल्ह्यातील १२ साखर कारखाने गळीत हंगामात पूर्ण क्षमतेने यंदा ऊस गाळप करण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षीच्या साखर उत्पादनात तब्बल ५५ टक्क्यांनी घट आली होती. ऊस गाळपही तब्बल २२ लाख ९१ हजार १३३ टनांनी कमी झाले होते. एकरी ऊस उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले होते. बारा साखर कारखान्यांनी मागील हंगामात २८,२९,८०४ टन उसाचे गाळप केले होते. त्यातून १९,२८,४६० क्विंटल साखर उत्पादन झाले होते. मात्र, यंदा एकरी उत्पादन, गाळप आणि साखर उत्पादनही मोठ्या प्रमाणात वाढण्याचे संकेत आहेत. हळुहळू साखर कारखाने सुरू होत आहेत. पाऊस चांगला झाल्याने जिल्ह्यातील ऊस क्षेत्र दुपटीपेक्षा अधिकने वाढून पीकही जोरदार आले आहे. त्यामुळे यंदा ऊस उत्पादन, कारखान्यांचे गाळप आणि साखर उत्पादन यात मोठी वाढ होण्याचे संकेत आहेत.
जिल्ह्यातील तेरणा, भैरवनाथ (वाशी), भैरवनाथ (सोनारी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नॅचरल शुगर, कंचेश्वर यांसह अन्य कारखाने गाळपासाठी सज्ज झाले आहेत. विविध जिल्ह्यांतून ऊसतोड कामगारांच्या टोळ्या जिल्ह्यात दाखल झालेल्या आहेत. ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून बिऱ्हाडासह हे कामगार जिल्ह्यात येत असल्याचे चित्र महामार्गासह विविध प्रमुख रस्त्यांवर दिसू लागले आहे. त्यांच्या राहुट्या दिसू लागल्या आहेत. धुळे-सोलापूर महामार्गासह विविध रस्त्यांवर ट्रॅक्टर-ट्रॉलीचा आवाज वाढला आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर ऊस पिकातील जमिनीत वाफसा होताच ऊस तोडणीसह गळीत हंगामाला वेग येणार आहे.












