परतूर : छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेच्यावतीने ऊसतोड कामगारांसाठी आरोग्य व पोषण खात्रिशीर सेवा प्रकल्पाच्या मध्यामातून पर्यायी उपजीविकेचा मार्ग म्हणून त्यांना पशुपालन, फळबाग सुरू करण्याचे कौशल्य, बांधकाम, इलेक्ट्रिकल, लघू उद्योगास सुरवात करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ३६ लाभार्थीना शेळीवाटप करण्यात आले. छोट्या-मोठ्या व्यवसायांसाठी मदत करून या मजुरांना कौशल्य प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षणही दिले जाणार आहे. परतूर तालुक्यातील १५ व घनसावंगी तालुक्यातील १५ गावांतील मंजुरांचा यात समावेश आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आप्पासाहेब उगले होते,
ऊस तोडणी मजूर दरवर्षी कर्नाटक, सोलापूर, सातारा, बारामती व इतर ठिकाणी कुटुंबांसह स्थलांतर करतात. त्यांचे स्वतःच्या आरोग्याकडे व बालकांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होते. या कामगारांनी गावात लघू व्यवसाय करावेत व स्थलांतर थांबावे म्हणून संस्थेच्यावतीने मदत करून नियमित गृहभेट देऊन लाभार्थीकडून माहिती घेण्यात येते. लमाणवाडी, माहेर जवळा, क्रांतिनगर, आसनगाव येथे सर्वेक्षण करण्यात आले. प्रकल्प संचालक भाउसाहेब गुंजाळ, अश्वजित जाधव, प्रकल्प व्यवस्थापक अनुप मोरे, माहिती तंत्रज्ञान विश्लेषक एकनाथ राऊत, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक टाकसळकर, कृष्णा पवार यांची उपस्थिती होती. राजेश वाघमारे, महादेव खरात, आकाश चौगुले, सुरेखा वाघमारे, दुर्गा नाडे, योगेश आढे आदींनी संयोजन केले.












