सांगली : उसाचा उत्पादनखर्च वाढला आहे. वीज बिल, पाणीपट्टी, मजुरी, कीटकनाशके, डिझेल आदीचे दर वाढले आहेत. त्यातच उसाचे उत्पादनही घटले आहे. त्यात ‘एफआरपी’मध्ये फारशी वाढ होताना दिसत नाही. त्यामुळे यंदा प्रतिटन किमान ३ हजार ७५१ रुपये दर मिळाला पाहिजे, अन्यथा कारखाने सुरू करू देणार नाही, असा इशारा ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला. बामणी येथील उदगिरी कारखान्याला याबाबत कार्यकारी संचालक चंद्रकांत गव्हाणे यांना ऊस दराबाबतचे निवेदन देण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी खराडे म्हणाले की, अनेक कारखान्यांत उसाच्या वजनातही काटामारी केली जाते. रिकव्हरीमध्येही चोरी केली जाते. ती थांबली पाहिजे. ऊस उत्पादक शेतकरी टिकविण्यासाठी उसाला योग्य आणि किफायतशीर दर मिळालाच पाहिजे, अन्यथा कारखान्यांची धुराडी पेटू देणार नाही. ऊस तोडणी मजूरही फसवणूक करतात. तीही थांबली पाहिजे. यासाठी संघर्ष सुरू आहे. यावेळी निशिकांत पोतदार, अनिल पाटील, सुभाष पाटील, राजेंद्र माने, उत्तम चंदनशिवे, चंद्रकांत पाटील, बबन सावंत, सागर पाटील, तानाजी धनवडे, संताजी जगताप, लक्षमण सावंत आदी उपस्थित होते.












