पट्टणकुडी : निपाणी- चिक्कोडी महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जनावरांच्या बाजाराच्या परिसरात सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ऊस वाहतूक रोखून धरली. त्यामुळे महामार्गावर वाहनांची रांगच लागली. उसाने भरलेल्या सुमारे २५ ट्रॅक्टर-ट्रॉली अडवण्यात आल्या. या महामार्गांवर नेहमीच प्रचंड वर्दळ असते. पण या आंदोलनात आंदोलकांनी इतर वाहनधारकांना कोणताही त्रास होऊ नये, म्हणून सर्व ट्रॅक्टर चालकांना महामार्गाच्या डाव्या बाजूला रोखून ठेवल्याने उर्वरित वाहतूक सुरळीत सुरू होती. इतक्या मोठ्या संख्येने ट्रॅक्टर रस्त्यावर राहिल्याने अनेक वाहनधारक कुतूहलाने विचारपूस करत होते.
कर्नाटक व महाराष्ट्र राज्यामध्ये उसाला योग्य दर मिळाल्याशिवाय कारखानदारांनी ऊस वाहतूक करू नये. तसेच एफआरपीप्रमाणे उसाला दर द्यावा, या मागणीसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. त्यानुसार, आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रवीण पळगे, टी. के. पाटील, अनिकांत पाटील, अजित यमकनमर्डी, सोमशेखर सरवडे, कोमल पाटील, ऋतुराज पोमाई, सतीश पोमाई, प्रमोद पाटील यांच्यासह निपाणी भागांतील शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.











