कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील दौलत- अथर्व कारखान्यात विविध मागण्यांसाठी कामावर बहिष्कार टाकलेल्या कामगारांनी आज शिफ्टनुसार हजर व्हावे; अन्यथा न्यायालयीन लढायला तयार राहावे, असा इशारा अथर्व कंपनीचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी दिला आहे. मात्र, कामगारांनी शिफ्ट डावलली आहे. त्यामुळे प्रशासनाने ३५ कामगारांना बडतर्फची नोटीस बजावली. सकाळी नऊच्या सुमारास सर्व कामगार कारखाना स्थळावर जमले. गेटपासून पाचशे मीटरवर थांबून त्यांनी बैठक घेतली. संघटनेचे नेते उदय नारकर यांना धमकीप्रकरणी निषेध करण्यात आला. दुपारी बारा वाजेपर्यंत थांबून सर्व कामगार घरी परतले. सर्व पाचशे कर्मचारी संघटनेत सहभागी असल्याचे संघटनेचे प्रदीप पवार यांनी सांगितले.
अथर्व प्रशासनाने कामगारांच्या नऊ मागण्या मान्य केल्या. मात्र, त्रिपक्षीय करारानुसार वेतन श्रेणी लागू करावी, या मागणीवरून मतभेद निर्माण झाले आहेत. कारखान्याचा गळीत हंगाम प्रारंभ झाल्यानंतर कामगारांनी शिफ्टनुसार कामावर यावे, अशी सूचना प्रशासनाने केली. मात्र, सेवेत कायम कर्मचाऱ्यांनी ती डावलून जनरल शिफ्टमध्येच कामावर येण्याची मनमानी केल्याचे आदेशात म्हटले आहे. हंगाम यशस्वितेसाठी शिफ्टनुसार काम करणे गरजेचे असताना कर्मचारी प्रतिसाद देत नसल्याने सुमारे दहा कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे असा दावा कंपनीने केला आहे. कामगारांनी आंदोलनाकडे पाठ फिरवल्यामुळे कारखाना स्थळावर तणावपूर्ण शांतता दिसत होती.











