बेळगाव : अखिल कर्नाटक रयत संघटनेच्यावतीने खानापूर येथील बसवेश्वर सर्कल-जांबोटी क्रॉस येथे चार तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी लैला शुगर्सचे एम. डी. सदानंद पाटील यांना बोलावून घ्यावे, त्यानंतरच आंदोलन मागे घेऊ, अशी भूमिका घेतली. यावेळी सदानंद पाटील यांनी लैला शुगर्सतर्फे पाहिली उचल ३१०० देत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बेळगाव जिल्ह्यात जो ऊस दर जाहीर होईल, तो देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
जेडीएस नेते नसीर बागवान, काडसिद्धेश्वर स्वामी, अँटोन सोजा, रमेश वीरपुरे, बिष्टप्पा सुबळी, नारायण पाटील, राजू वीरपुरे, सेबॅस्टियन सोजा, पास्कल सोजा, गोपाल आगासिमानी, यल्लाप्पा चन्नापूर, शिवाजी अंबाडगट्टी, रवी अंबाडगट्टी, दत्ता बिडकर, चांगापा निलजकर यांच्यासह खानापूर तालुक्यातील शेतकरी व नागरिकांनी आंदोलनात सहभाग घेतला. रयत संघटनेचे नेते किशोर मिठारी आणि शेतकरी नेते अशोक यमकनमर्डी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी आल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला होता.तहसीलदार दंडाप्पा कोमार यांनी घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्यांची समजूत काढली. तालुक्यातील शेतकऱ्यांना तालुक्यातील साखर कारखान्यांमध्ये ऊस पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन अवरोळी मठाचे चन्नबसव देवरू यांनी केल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. पोलिस निरीक्षक लालसाब गवंडी व पोलिस अधिकाऱ्यांनी ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला.











