कोल्हापूर : ऊसदराबाबत आज, बुधवारी थेट मुख्यमंत्र्यांनाच जाब विचारणार आहे, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ऊसदर बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील आठ कारखान्यांनी मागील हंगामाची एफआरपी थकवली असल्याचे निदर्शनास आणून दिले. जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, साखर सहसंचालक संगीता डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांवर अद्याप कारवाई झालेली नाही. तसेच तीन कारखान्यांनी एफआरपीपेक्षा कमी दर जाहीर केला. अशा कारखान्यांना नोटीस काढणे बंधनकारक होते. गेल्या हंगामातील रेव्हिन्यू शेअरिंग फॉर्म्युल्यानुसार कारखान्यांनी २०० रुपये दिले नाहीत, या सर्व बाबींचा हिशोब शेट्टी यांनी मांडला.
ऊस दराबाबत आयोजित बैठकीत माजी खासदार शेट्टी, आंदोलन अंकुश संघटनेचे नेते धनाजी चुडमुंगे यांनी थकबाकीदार कारखान्यांबाबत प्रश्न उपस्थित केले. जिल्ह्यातील आठ साखर कारखान्यांनी गत हंगामातील ३५ कोटी १५ लाखांची एफआरपी थकवली आहे. त्यांच्यावर कारवाई झाली नाही. त्या कारखान्यांना यंदाच्या हंगामात परवानगीही दिली गेली. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून तीन साखर कारखान्यांनी एफआरपीपेक्षा कमी दर जाहीर केला. त्यांच्यावरही कारवाई करा अशी आग्रही मागणी शेतकरी नेत्यांनी दिली. बुधवारी मुख्यमंत्री जिल्ह्यात येणार आहेत. त्यांना ऊस दराबाबत जाब विचारणार आहोत असे शेट्टी म्हणाले. प्रा. जालंदर पाटील, शिवाजी माने, सावकर मादनाईक, अजित पवार, जनार्दन पाटील आदींसह शेतकऱ्यांनी ऊस दराबाबतचा प्रश्न मांडला. साखर सहसंचालक सरीता डोंगरे यांनी थकीत कारखान्यांना गाळप परवाना देण्याचा निर्णय मंत्री समितीचा आहे, असे सांगितले.












