कोल्हापूर : ऊस दराच्या प्रश्नावरून कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला असून, आंदोलन पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर आले असता अज्ञात शेतकऱ्यांनी त्यांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे पोलिसांची एकच तारांबळ उडाली.
तत्पूर्वी, ऊसदराबाबत आज, बुधवारी थेट मुख्यमंत्र्यांनाच जाब विचारण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला होता. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ऊसदर बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील आठ कारखान्यांनी मागील हंगामाची एफआरपी थकवली असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, साखर सहसंचालक संगीता डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांवर अद्याप कारवाई झालेली नाही. तसेच तीन कारखान्यांनी एफआरपीपेक्षा कमी दर जाहीर केला. अशा कारखान्यांना नोटीस काढणे बंधनकारक होते. गेल्या हंगामातील रेव्हिन्यू शेअरिंग फॉर्म्युल्यानुसार कारखान्यांनी २०० रुपये दिले नाहीत, या सर्व बाबींचा हिशोब शेट्टी यांनी मांडला होता.












