लातूर : काही वर्षं अपवाद वगळता तब्बल १५ वर्षांपासून बंद पडलेला किल्लारीचा श्री निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखाना आता नव्या रूपात, नव्या ऊर्जेसह आणि दुप्पट क्षमतेने गळीत हंगामासाठी सज्ज झाला आहे. लातूर, धाराशिव जिल्ह्यातील हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारखान्याचा गळीत हंगामाचा प्रारंभ सोमवारी (ता. १०) सकाळी साडेअकरा वाजता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होईल. एकेकाळी बंद होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या कारखान्याने नव्या उत्साहाने उभारी घेतली आहे. या पुनरुज्जीवनाच्या प्रवासामुळे लातूर, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर किल्लारी पुन्हा नव्या उत्साहाने गोडवा गाळायला सज्ज झाला आहे. कारखाना सुरू झाल्याने किल्लारीच्या बाजारपेठेलाही चालना मिळणार आहे. याशिवाय या भागात ऊस लागवड क्षेत्रातही मोठी भर पडणार आहे.
सहकार व साखर उद्योग क्षेत्रातील नामांकित उद्योजक ज्येष्ठ मार्गदर्शक बी. बी. ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली गाळप शुभारंभ कार्यक्रम होणार आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, आमदार अमित देशमुख, आमदार प्रवीण स्वामी, आमदार रमेश कराड, डॉ. संजय कोलते, दीपक तावरे आदींची उपस्थिती लाभणार आहे. गळीत हंगामाच्या प्रारंभी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमास सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, व्यापारी, ऊस तोडणी व वाहतूक कंत्राटदार आदींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार अभिमन्यू पवार यांनी केले.












