नाशिक : द्वारकाधीश कारखाना सहा लाख टन ऊस गाळप करणार, १५ दिवसांत पहिला हप्ता देणार

नाशिक : शेवरे येथील द्वारकाधीश साखर कारखान्याचे यंदाच्या हंगामात सहा लाख टन गाळपाचे उद्दिष्ट आहे. उसाला योग्य दर देण्यात कारखाना कमी पडणार नाही. शेतकऱ्यांनी शाश्वत उत्पन्नासाठी दर्जेदार उसाची लागवड करून एकरी शंभर टनापुढे झेप घ्यावी, असे आवाहन कार्यकारी संचालक सचिन सावंत यांनी केले. कारखान्याच्या २६ व्या गळीत हंगाम प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. द्वारकाधीश मंदिरातील कार्यक्रमावेळी अध्यक्ष शंकरराव सावंत, उपाध्यक्ष चंद्रकला सावंत, संचालक कैलास सावंत, डॉ. वर्षा पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. ऊस उत्पादक भाऊसाहेब मोरे, काशिनाथ पगार , चैतन्य पाटील, अरविंद गावित, रूबन कोकणी यांच्या हस्ते सपत्नीक गव्हाण पूजन करण्यात आले.

मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव भालेराव यांनी प्रास्ताविक केले. कार्यकारी संचालक सावंत यांनी कारखान्याच्यावतीने एक टन मोफत व लागवडीसाठी लागणारे पुढील उसाचे बेणे, खते, औषधे वसूलपात्र देण्यात येत आहे. ऊस विकास योजनेसाठी दहा कोटींचे नियोजन आहे. गाळपानंतर पंधरा दिवसांत पहिला हप्ता देण्यात येणार आहे. कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव सावंत यांनी शेतकऱ्यांना कारखान्याच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. उसाची शास्त्रोक्त पद्धतीने लागवड केल्यास एकरी शंभर मेट्रिक टनांपर्यंत झेप घेणे शक्य असल्याचे ते म्हणाले. यावेळी ऊस उत्पादक राजेंद्र शिरवाडकर, पंकज भामरे, सुभाष अहिरे, काशिनाथ नंदन, विजय सूर्यवंशी, अनिल राजपूत, सरलाबाई अहिरे, सोमनाथ साबळे, सुनीता गर्गे, मनोज पाटील, रोहिदास खैरनार, संतोष गवळी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्वाधिक ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here