नांदेड : गेल्या वर्षी ऊस तोडणीसाठी उचल म्हणून दिलेल्या रक्कमेवरून झालेल्या वादातून तोडमी कामगाराचे अपहरण करण्यात आल्याची घटना देवगाव फाटा येथे घडली. पती अनिल रोहिदास चव्हाण (वय ३५, रा. वाघी, ता. जिंतूर) असे अपहरण झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी जिंतूर तालुक्यातील वाघी येथील सगुणा अनिल चव्हाण यांनी फिर्याद दिली असून चौघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गौरख चव्हाण (रा. घांगरा, ता. जिंतूर), ज्ञानेश्वर राठोड (रा. लिंबोना, ता. मंठा), कृष्णा मौरे, अमोल ऊर्फ मंगेश मौरे (दोघे रा. सोलापूर) अशा ५ चौघांनी संगनमत करून गुरुवारी (ता. ३०) रात्री अनिल चव्हाण यांचे अपहरण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
ऊसतोड मजूर सगुणा चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, उचल म्हणून दिलेल्या रकमेच्या कारणावरून चौघांनी संगनमत करून अनिल चव्हाण यांचे अपहरण केले. या फिर्यादीनुसार संशयितांविरोधात चारठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मागील वर्षी ऊस तोडणीसाठी उचल म्हणून दिलेल्या रकमेपैकी उरलेले पैसे तू आताच का देत नाहीसस या कारणावरून संशयितांनी अनिल यांना एका कारमध्ये जबरदस्तीने उचलून नेत अपहरण केले. याप्रकरणी संशयितांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक मुंजाजी दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल राठोड तपास करीत आहेत.












