सोलापूर : मंगळवेढा तालुक्यात सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात पावसाचा तडाखा बसला. यामध्ये तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सध्या या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. हे खड्डे दुरुस्त करण्यास सार्वजनिक बांधकाम खात्याने दुर्लक्ष केल्याची स्थिती आहे. मात्र, ऊस वाहतुकीला होणारा अडथळा लक्षात घेत श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याने येथील १५ किलोमीटर अंतरातील खड्डे स्वखर्चाने दुरुस्त केले आहेत. त्यामुळे वाहनधारकांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या रस्त्यांवरील खड्डे दुरुस्त करण्याची मागणी तालुका काँग्रेसने केली होती.
गेल्या काही महिन्यांपासून मंगळवेढा ते दामाजी साखर कारखाना, दामाजी कारखाना ते सोलापूर महामार्ग या १५ कि.मी. रस्त्यावरील खड्ड्यामुळे वाहनधारकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मंगळवेढा- खोमनाळ रस्त्यावरील खड्डे अद्याप दुरुस्त केलेले नाहीत. या मार्गावरून लवंगीच्या साखर कारखान्याला वाहने जातात. शिवाय, मोठ्या प्रमाणात वाहने दामाजी कारखान्यावर येत आहेत. त्यामुळे वाहनधारकांचे नुकसान टाळण्यासाठी कारखान्याने १५ किलोमीटर वरील रस्त्यावर पडलेले खड्डे स्वखर्चाने बुजवले. याबाबत दामाजी शुगरचे अध्यक्ष शिवानंद पाटील म्हणाले की, कारखान्याच्या गळीत हंगामात दामाजी कारखान्याला ऊस गाळप करणाऱ्या वाहनांचे नुकसान होऊ नये म्हणून या रस्त्यावर पडलेले खड्डे संचालक मंडळाने कारखान्याच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला.












