ऊस तोडणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे शास्रज्ञांचे आवाहन

कोल्हापूर : सध्या राज्यात अनेक साखर कारखाने ऊस तोडणीसाठी ऊस तोडणी यंत्र वापरत आहेत. या यंत्रांमुळे तोडणी प्रक्रियेत वेग, कार्यक्षमता आणि एकसमानता प्राप्त होते. तसेच मजूर टंचाईच्या समस्येवर प्रभावी उपाय मिळतो. तोडणी जलद, अचूक आणि एकसमान होते. तसेच मातीचा संपर्क कमी झाल्याने ऊस स्वच्छ आणि गुणवत्तायुक्त राहतो. पाचट कुटी होऊन शेतातच राहते आणि ते कुजून सेंद्रिय कर्ब वाढतो. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते, खोडवा एकसमान फुटतो. ऊस जातिनिहाय म्हणजे लवकर पक्व होणाऱ्या, मध्यम पक्व होणाऱ्या आणि उशिरा पक्व होणाऱ्या ऊस जातींचा विचार करून तोडणी कार्यक्रम तयार करून तो राबविणे आवश्यक आहे. योग्य परिपक्वतेच्या अवस्थेत म्हणजे ब्रिक्स १८ ते २० टक्के असताना ऊस तोड केल्यास साखर उतारा वाढतो, उत्पादनाची गुणवत्ता सुधारते असे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.

याबाबत पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे डॉ. समाधान सुरवसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऊस तोडणी करताना हंगामनिहाय म्हणजेच आडसाली, पूर्वहंगामी, सुरू तसेच खोडव्याचा ऊस यांचा विचार करावा. पिकाचे उत्पादन केवळ क्षेत्रफळ, जाती आणि व्यवस्थापन पद्धतींवर अवलंबून नसून, योग्य वेळी आणि योग्य प्रकारे ऊस तोडणी करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. अनेकदा ऊस वेळेआधी किंवा उशिरा तोडल्यास साखरेचा उतारा घटतो, गाळप कार्यक्षमतेत घट होते आणि शेतकऱ्याला आर्थिक नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे ऊस परिपक्वतेचे अचूक मूल्यांकन, योग्य तोडणी पद्धतींचा अवलंब, तसेच तोडणीनंतरची काळजी या सर्व टप्प्यांचे नियोजन शास्त्रीय पद्धतीने करणे अत्यावश्यक आहे.

ऊस तोडणी योग्य परिपक्वतेच्या अवस्थेत करणे अत्यंत आवश्यक आहे, कारण त्यावरच साखरेचा उतारा, रसाची गुणवत्ता आणि आर्थिक परतावा अवलंबून असतो. जर ऊस अपरिपक्व अवस्थेत तोडला गेला तर त्यातील साखर पूर्णपणे तयार झालेली नसते, त्यामुळे रस पातळ राहतो, साखरेचे प्रमाण कमी मिळते आणि कारखान्याच्या कार्यक्षमतेवर प्रतिकूल परिणाम होतो. ऊस तोडणीपूर्वी १५ ते २० दिवस आधी पाणी बंद केल्यास उसाचा ओलावा संतुलित राहतो आणि तोडणीनंतर गुणवत्तायुक्त व टिकाऊ ऊस मिळतो. जमिनीच्या लगत तोडणी केल्यास खोडवा एकसमान व जोमदार फुटतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here