चिक्कोडी : बेळगाव जिल्ह्यातील गुर्लापूर क्रॉसवर निपाणी-मुधोळ महामार्गावर ऊस दरासाठी सुरू असलेल्या आंदोलनस्थळी बुधवारी राज्य सरकारच्या वतीने मंत्री एच. के. पाटील यांनी भेट घेऊन चर्चा केली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी येथे शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास पाठविले आहे. गुरुवारी संघटना पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल. त्यानंतर शुक्रवारी कारखानदारांशी व जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, असा तोडगा काढू असे त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले. मात्र, शेतकरी संघटनेने त्यास विरोध करत गुरुवारी संध्याकाळपर्यंत निर्णय द्यावा, अन्यथा राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा इशारा दिला.
दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सरकारवर दबाव टाकून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली. गुरुवारपर्यंत निर्णय न घेतल्यास कर्नाटक राज्य बंदची हाक देऊ, असा इशाराही संघटनेने दिला. जिल्ह्यातील राजकीय व्यक्तींकडून आंदोलनाला अपेक्षित पाठिंबा देण्यात येत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला. तर संघटनेचे गौरवाध्यक्ष शशिकांत पडसलगी यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचा प्रस्ताव आम्हाला मान्य नाही. गुरुवारी रात्री आठपर्यंत सरकारने निर्णय द्यावा. अन्यथा राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या मारून आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा दिला. जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना ३२०० दराची तयारी असल्याचे माहिती असूनही पुन्हा नव्याने चर्चा करण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले. संघटनेचे अध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी यांनी कारखानदारांची भूमिका आडमुठी असल्याचा आरोप केला. कारखानदार जिल्हाधिकाऱ्यांकडे आपल्याला अधिक रक्कम देता येत नसल्याचे सांगत आहेत असे ते म्हणाले.












