कोल्हापुरात ऊसदराची कोंडी : शेतकरी संघटनांचे प्रादेशिक साखर संचालक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

कोल्हापूर : ऊस दराची कोंडी न फुटल्याने जिल्ह्यात ऊस हंगाम नियमित सुरू होण्यामध्ये अडथळे कायम आहेत. ही कोंडी फोडण्यासाठी शिरोळच्या दत्त कारखान्याने पहिल्यांदा ३४७७ दर जाहीर करून सकारात्मक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला. मात्र ‘स्वाभिमानी’सह इतर शेतकरी संघटनांनी ही दरवाढ नाकारली. त्यामुळे जिल्ह्यात बहुतांशी भागात ऊस तोडी बंद आहेत.जय शिवराय किसान संघटनेसह अन्य शेतकरी संघटनांनी येथील प्रादेशिक सहकारी साखर संचालक कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले.

शिवाजी माने, भगवान काटे आदींसह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. मागच्या हंगामातील दोनशे रुपये मिळावेत या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. यामध्ये जय शिवराय किसान संघटना, शेतकरी सेना, महाराष्ट्र, शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना बळीराजा संघटना, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड, आम आदमी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, किसान मोर्चा, सी. पी. आय. कोल्हापूर, अखिल भारतीय मराठा महासंघ, रयत संघटना कर्नाटक आदी संघटनांनी सहभाग घेतला आहे.

अनेक कारखान्यांनी ३४५० पेक्षा अधिक दर जाहीर केल्याने सकारात्मक राहतील, अशी शक्यता होती. कारखान्यांनी पूर्वीच्या दरापेक्षा जादा दर जाहीर करून ही संघटनांच्या प्रतिनिधींनी असमाधान व्यक्त केल्याने ऊस दराचा तिढा कायम राहिला आहे.भोगावती कारखान्याने ३६५३ रुपये दर देत उच्चांकी मजल मारली आहे. कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील व संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यातील पश्चिम भागातील कारखान्यांनी ३५०० च्या वर दर दिला आहे. तर उच्चांकी उत्पादन असणाऱ्या शिरोळ हातकणंगले तालुक्यात मात्र कारखान्यांनी ३४०० च्या आसपास दर दिल्याने शेतकरी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here