बिबट्याची दहशत, ऊसतोड कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी घ्या : साखर आयुक्तालयाच्या कारखान्यांना सूचना

पुणे : ऊसतोडणी हंगामात बिबट्याच्या हालचालींचा वाढता धोका लक्षात घेऊन, साखर आयुक्तालयाने सर्व सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांना ऊसतोड कामगारांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रामुख्याने पती-पत्नी कामगार ऊसतोडणी करीत असताना, त्यांच्या मुलांच्या संगोपनाची, तसेच शिक्षणाची व्यवस्था करण्यासह शेतकऱ्यांमध्ये जनजागृती वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

वनविभागाच्या मदतीने बिबट्याच्या अधिवासाची माहिती देणे, शेताऐवजी सुरक्षित ठिकाणी निवासाची सोय करणे, झोपड्यांना संरक्षण देण्याबाबतही सूचना केल्या आहेत. राज्यात ऊसगाळप हंगाम सुरू असून, ऊसतोडणी सुरू झाली आहे. बिबट्याचा अधिवास हा ऊस क्षेत्रात वाढल्याने मानवी वस्तीवर हल्ल्यांचे प्रमाण काही दिवसांपासून वाढले आहे.

ऊस तोडणीवेळी काय खबरदारी घ्यावी, तसेच कारखान्यांनी कोणत्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या, याची नियमावली साखर आयुक्तालयाने सर्व कारखान्यांना पाठवली आहे. त्यामध्ये, ऊसतोड कामगाराच्या वास्तव्याच्या ठिकाणी सौरऊर्जा कुंपण करावे.लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना घराच्या बाहेर आणि शेतात एकटे सोडू नका. शेतात समूहाने काम करावे, घराबाहेर आणि शेतात उघड्यावर झोपू नका. दिवस उगवण्यापूर्वी आणि दिवस मावळल्यानंतर शेतात जाऊ नका, असे सुचविले आहे.

दरम्यान, ऊस कारखान्यांच्या परिसरात आणि ऊसतोडणीच्या ठिकाणी कामगार झोपड्या उभारून वास्तव्य करतात. या काळात ऊसतोडणीदरम्यान बिबट्याची पिल्ले आढळणे, तसेच कामगारांवर हल्ल्यांच्या घटना वाढल्याचे निदर्शनास येत आहे. विशेषतः पती-पत्नी ऊसतोडणीच्या कामात गुंतलेले असताना, त्यांच्या लहान मुलांवर बिबट्याचे हल्ले होण्याच्या घटनाही वारंवार घडत आहेत.

दैनिक ‘सकाळ’शी बोलताना साखर आयुक्त डॉ. संजय कोलते म्हणाले की, ऊसगाळप सुरू झाला असल्याने बिबट्याचा धोका टाळण्यासाठी ऊसतोडणी कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी समूहाने काम करावे. बिबट्याचा अधिवास असलेल्या भागातील ऊसक्षेत्रात वनविभागाने जनजागृती, त्याचबरोबर आवश्यक उपाययोजना करण्याची सूचना दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here