नांदेड : बळिराजा साखर कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन ३,५०० वरून ७,५०० मेट्रिक टन करण्यात आली आहे. कारखान्याची ऊसतोड वाहतूक यंत्रणा, कुशल कर्मचारी वर्ग या गळीत हंगामासाठी तत्पर आहेत. शेतकऱ्यांनी कारखान्यास जास्तीत जास्त ऊस देऊन कारखान्यास सहकार्य करावे. ११ लाख मेट्रिक टनाचे ऊस गाळपाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी शेतकरी, ऊस तोडणी व वाहतूक ठेकेदार, अधिकारी, कर्मचारी व कामगारांनी सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक अजय जाधव यांनी केले. कारखान्याचा १२ वा गळीत हंगाम मोळीपूजन कार्यक्रम गुरुवारी जाधव यांच्या हस्ते झाला. यावेळी त्यांनी गाळपाचे उद्दिष्ट जाहीर केले.
जाधव म्हणाले की, एफआरपीप्रमाणे यंदाही गळीत हंगामात ऊस उत्पादकांना भाव देणार आहे. सध्या कारखान्याकडे सभासदांच्या ११ हजार २५६ हेक्टर उसाची नोंद आहे. सभासदांचा ऊस गाळप झाल्यानंतर बिगर सभासदांचा ऊस गाळपासाठी आणला जाईल. या कार्यक्रमात माधव मोहीते यांनी सूत्रसंचालन केले. जगदीश जोगदंड यांनी आभार मानले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. दत्तात्रेय वाघमारे, संचालक दिनकराव जाधव, माजी नगराध्यक्ष उत्तमराव कदम, गंगाधराव धवन, सुशील वरपुडकर, मारोतराव बखाल, चांदोजी बोबडे, गोंवद चव्हाण, राजेश धूत, नामदेव जाधव, डॉ. गुलाब इंगोले, व्यंकटराव पारवे, आनंद आजमेरा, दिलीप माने, दशरथ भोसले, नागनाथ शिंदे, निवृत्ती सोलव, प्रताप बखाल, बाबूराव बोबडे आदींसह कारखान्यातील सर्व विभागांतील विभागप्रमुख, कर्मचारी, शेतकरी, ऊसतोड वाहतूक ठेकेदार उपस्थित होते.











