बेळगाव : उत्तर कर्नाटकात ऊस दरासाठी शेतकऱ्यांनी पुकारलेले आंदोलन आठव्या दिवशीही सुरूच राहिले. शेतकरी प्रति टन ३,५०० रुपये दराच्या मागणीवर ठाम आहेत. तर साखर कारखानदारांनी ३,२०० रुपये दर देऊ केला आहे. हा दर त्यांनी धुडकावून लावला. यामुळे बेळगाव आणि बागलकोटसह राज्यातील तब्बल २६ साखर कारखान्यांचे गाळप पूर्णपणे ठप्प झाले आहे. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेत साखरमंत्री शिवानंद पाटील यांनी हुबळीहून बेळगावकडे धाव घेतली. संतप्त शेतकऱ्यांनी त्यांच्या वाहनावर चपला आणि बाटल्या फेकल्या.
गुर्लपूर येथील आंदोलनस्थळी साखरमंत्री शिवानंद पाटील, साखर महामंडळाचे अध्यक्ष अशोक दलवाया यांनी भेट देऊन तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला. आज, शुक्रवारी मुख्यमंत्री २ सिद्धरामय्या यांच्या सोबत कारखानदारांची बैठक घेवून सन्माननीय तोडगा काढू असे आश्वासन मंत्री पाटील यांनी दिले. त्यामुळे आज शुक्रवारी होणारा राष्ट्रीय महामार्ग रोको तात्पुरता मागे घेण्यात आला असल्याची घोषणा रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी केली. दरम्यान, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे की, उसाची एफआरपी निश्चित करणे आणि साखर निर्यात थांबवण्याचे अधिकार केंद्राकडे आहेत. केंद्राच्या धोरणांमुळेच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. केंद्र सरकारने भाजपचे शासन नसलेल्या राज्यांत भेदभावाचे धोरण अवलंबले आहे. शेतकऱ्यांनी राज्यातील भाजपच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नये.











