कोल्हापूर : देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याची जानेवारीत झालेली बिनविरोध निवडणूक वैध असल्याचा निकाल उच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. या निकालाने पी. एम. पाटील गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. सर्किट बेंच कोल्हापूर येथे याचिकेवर न्या. चपळगावकर यांच्यापुढे झालेल्या सुनावणीत न्यायाधीशांनी दोन्ही बाजूंच्या वकिलांचे म्हणणे ऐकून गुरुवारी निकाल दिला. या निकालानतंर कारखान्याचे अध्यक्ष पी. एम. पाटील यांनी देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या विचाराने आम्ही चालवित असलेला कारखाना कर्जमुक्त होऊन प्रगतिपथावर असताना विरोधकांनी सभासदांची दिशाभूल करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेतला होता. अखेर त्यांना न्यायदेवतेनेच चपराक दिली अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
न्यायालयाने कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाला दिलासा दिल्याची माहिती संचालक प्रमोद पाटील यांनी दिली. कारखान्याची निवडणूक डिसेंबर २०२४ मध्ये जाहीर झाली होती. अर्ज माघारीनंतर पी. एम. पाटील पॅनेलचे १७ संचालकांचे अर्ज शिल्लक राहिल्याने निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यास मान्यतेसाठी सहकार निवडणूक प्राधिकरणकडे ही नावे पाठविली. तथापि, काहींनी याविरोधात तक्रारी दाखल केल्याने प्राधिकरणाने ही निवडणूक रद्द ठरवली व फेरनिवडणूक जाहीर केली. त्याविरोधात काही सभासद उच्च न्यायालयात गेले होते. दरम्यान, तक्रारदार सुकुमार गडगे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले.











