सोलापूर : उसाला ३५०० रुपये उचल देण्याच्या मागणीसाठी ‘स्वाभिमानी’चा आंदोलनाचा इशारा

सोलापूर : चालू गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये उसाला पहिली उचल एकरकमी विनाकपात ३५०० रुपये प्रतिटन जाहीर करावा अशी मागणी माळशिरस तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी साखर कारखानदारांकडे केली. कार्यकर्त्यांनी श्री शंकर सहकारी साखर कारखाना (सदाशिवनगर), सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना (अकलूज), दि सासवड माळी शुगर फॅक्टरी (माळीनगर), ओंकार साखर कारखाना (चांदापुरी), पांडुरंग सहकारी साखर कारखाना (श्रीपूर) या कारखान्यांना निवेदन दिले. साखर कारखान्यांनी येत्या ११ नोव्हेंबरपूर्वी पहिली उचल जाहीर करावी; अन्यथा १२ नोव्हेंबरनंतर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला.

संघटनेचे माळशिरस तालुकाध्यक्ष अजित बोरकर म्हणाले की, सर्व साखर कारखान्यांनी पहिली उचल जाहीर न करता आपले कारखाने सुरू केले आहेत. कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून पहिली उचल जाहीर करावी. अन्यथा, स्वाभिमानीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील. स्वाभिमानीने तालुक्यातील साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांना निवेदन दिले. यात म्हटले आहे की, यावर्षी साखर तसेच इथेनॉल, बगॅस, मोलॅसिस, प्रेसमड, अल्कोहोल यांनाही चांगला भाव आहे. उप पदार्थांचे दरही स्थिर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार दराची घोषणा न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल. स्वाभिमानीचे पदाधिकारी ज्येष्ठ नेते मगन काळे, विजय नेवसे, अजित बोरकर, अमरसिंह माने-देशमुख आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here