कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथे ऊस वाहतूक करणारी वाहने अडविली. तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याने ऊस दर जाहीर न करताच गाळप सुरू केल्याने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. वाठार कोडोली राज्य मार्गावर गुरुवारी दुपारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वारणेकडे ऊस घेऊन जाणारी ट्रॅक्टर वाहतूक दीड तास रोखली. दोन दिवसांत दर जाहीर करण्याची मागणी धनाजी पाटील यांनी केली. यावेळी कारखाना प्रशासनाकडून येत्या दोन दिवसांत पूर्ण एफआरपी जाहीर करणार असल्याचे सांगण्यात आल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हुपरी येथे कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक रोखली. शहराच्या प्रवेश मार्गावर सिद्धार्थ नगरमध्ये दुपारी बाराच्या सुमारास हा प्रकार घडला. दर जाहीर न करता ऊस वाहतूक का सुरू केली, असा सवाल संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विचारला. यावेळी उद्यापासून वाहतूक होणार नाही असे आश्वासन देण्यात आले. तालुकाध्यक्ष राजाराम देसाई, अशोक बल्लोळे, रामा पाटील, विजय माळी, भीमा सव्वाशे आदींसह कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.











