कोल्हापूर : कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या चालू ऊस गाळप हंगामाची एफआरपी प्रति मेट्रिक टन ३,३१८ रुपये व अतिरिक्त २०० रुपये असा ३,५१८ रुपये सुधारित ऊस दर ज्येष्ठ संचालक माजी आमदार प्रकाश आवाडे व आमदार राहुल आवाडे यांनी जाहीर केला. दरम्यान, यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे गाळपास येणाऱ्या उसास विनाकपात एकरकमी ३,४०० प्रमाणे होणारी रक्कम नियमाप्रमाणे १४ दिवसांत व हंगाम समाप्तीनंतर एक महिन्यामध्ये उर्वरित ११८ रुपये प्रमाणे रक्कम अदा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कारखाना प्रशासनाने जाहीर केलेला सुधारित ऊस दर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मान्य असून, ऊस दराबाबतचे यापुढील आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची माहिती संघटनेचे पदाधिकारी राजाराम देसाई व अशोक बल्लोळे यांनी दिली. त्यामुळे कारखान्याचा ऊस गळीत हंगाम सुरळीतपणे पार पडण्यामधील अडथळे दूर झाले आहेत. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, प्रकाश आवाडे व आ. राहुल आवाडे यांच्या नेतृत्वाखालील कारखान्याकडे चालू हंगामाकरिता सुमारे २२ हजार ७०० हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद झाली आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस गाळपास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांनी पत्रकाद्वारे केले आहे.












