सांगली : कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणेच सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना उसाचा दर द्यावा, अन्यथा १२ तारखेनंतर रस्त्यावर उतरून कारखाने बंद पाडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधगाव (ता. मिरज) येथील जाहीर सभेत दिला. शेट्टी म्हणाले, सध्या फायद्यातच आहे. तसे नसते तर एकेक कारखानदार १७-१८ कारखाने चालवू शकला नसता. शेतकऱ्यांना अर्थकारण शिकवण्याच्या फंदात कारखानदारांनी पडू नये. कोल्हापरप्रमाणेच सांगलीतही ३५०० ते ३७०० रुपये दर मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
शेट्टी म्हणाले की, शेतकरी संकटात सापडला असून, मागील सात-आठ महिन्यांपासून अतिवृष्टी, गारपिटीमुळे पिचून गेला आहे. त्यामुळे सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे. सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांना वगळून शक्तिपीठ महामार्गाचा घाट कायम आहे. नागपूर-रत्नागिरी महामार्ग आठपदरी करावा. त्यातील दोन मार्गिका एक्स्प्रेस हायवेच्या धर्तीवर तयार कराव्यात. तो रद्दच करावा. सध्याच्या महामार्गाचा पथकर वसूल होत नसताना, पुन्हा दुसऱ्या महामार्गाचा अट्टाहास नको, असेही त्यांनी सांगितले. यावेळी माजी खासदार संजय पाटील, बजरंग पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे, संदीप राजोबा, संजय बेले, विक्रम पाटील, प्रवीण पाटील, आदी उपस्थित होते.












