कोल्हापूर : कोल्हापुरी गुळाला भारतासह परदेशात चांगली मागणी असते. या गुळाला लंडन, कॅनडा, अमेरिका, दुबई, मस्कतसह आखाती देशात खूप मागणी असते. मुंबईहून व्यापारी या गुळाची खरेदी करून वरील देशांत निर्यात पाठवितात. साधारणतः नोव्हेंबर ते जानेवारी या थंडीच्या काळात गुळाची मागणी वाढते. पण गेल्या दोन वर्षांपासून निर्यात हळूहळू कमी होऊ लागली आहे. गेल्या वर्षभरात तर निर्यातीचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाले आहे. कर्नाटकातील गूळ कमी दराने मिळत असल्याने निर्यातीवर परिणाम झाला आहे. स्थानिक बाजारपेठेत गुळाची आवक वाढल्याने दर घसरले आहेत.
‘कोल्हापुरी’ आणि ‘कर्नाटकी’ गुळाच्या दरात सरासरी प्रतिक्विंटल ४०० चा फरक आहे. निर्यात खर्च आणि परदेशात मिळणारा दर पाहता, मुंबईतील व्यापाऱ्यांची कर्नाटकीलाच अधिक पसंती दिसते. मुंबईतील व्यापाऱ्यांकडून वर्षभरात साधारणता एक हजार टन गुळाची निर्यात होते. कर्नाटकात गुळामध्ये रस कमी आणि साखर अधिक वापरली जाते. आपल्याकडे ८० टक्के रस आणि २० टक्के साखरेचे प्रमाण असल्याने आपला उत्पादन खर्च तुलनेत अधिक असतो. त्याचा परिणाम गुळाच्या दरावर होत असल्याचे काही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. कोल्हापूर बाजार समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी दळवी यांच्या म्हणण्यानुसार, कोल्हापुरी गुळाची मागणी कमी झालेली नाही. थेट निर्यात येथून होत नसल्याने त्याचा अंदाज येत नाही. मुंबईतील व्यापाऱ्यांना बारीक कणीचा गुळ लागतो.

















