कोल्हापूर : शिरोळ- जयसिंगपूर मार्गावरील केपीटीसमोर रविवारी रात्री आंदोलन अंकुश संघटनेने नियमबाह्य ऊस वाहतुकीवर कारवाईची मागणी करत ऊस वाहतुकीची वाहने रोखली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. अशा वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली. यावेळी कारखाना समर्थक व आंदोलकांत यावेळी जोरदार खडाजंगीदेखील झाली. जोपर्यंत ऊस दराचा तोडगा निघत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार अशी भूमिका ‘अंकुश’ने घेतली आहे. अनेक वाहनधारक नियमबाह्य ऊस वाहतूक करत आहेत. त्यांच्यावर प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी दत्त कारखान्याचे संचालक शेखर पाटील व आंदोलकातही बाचाबाची झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, सकाळपासून प्रादेशिक परिवहन विभागाने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची तपासणी सुरू केली. काही वाहनांवर दंडात्मक कारवाईहीदेखील करण्यात आली आहे. रविवारी रात्री आठच्या सुमारास शिरोळ- जयसिंगपूर मार्गावरील केपीटीसमोर आठ ते दहा वाहने अडविल्यानंतर वादावादीचा प्रसंग घडला.












