लातूर : शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, यासाठी केवळ साखरेवर अवलंबून राहता येणार नाही, त्यामुळे कारखान्यांनी बायप्रॉडक्ट निर्मितीकडे लक्ष दिले पाहिजे. शेतकऱ्यांचे उसाचे उत्पादन एकरी साठ टनांपेक्षा जास्त आले, तरच त्यांना नफा मिळेल, असे केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी केले. किल्लारी येथील श्री निळकंठेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ४२ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ सोमवारी (ता. दहा) गडकरी यांच्या हस्ते झाला. यानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते.
गडकरी म्हणाले, की कारखाना चालविणे म्हणजे अतिशय आव्हानात्मक काम आहे. केवळ साखर विकून नफा मिळवता येत नाही. कारखानदारांनी इथेनॉल निर्मिती, डिस्टिलरीसारख्या बायप्रॉडक्ट उद्योगांवर भर द्यावा. त्यातून कारखान्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि शेतकऱ्यांना उसाचा योग्य मोबदला वेळेवर देता येईल. साखर उद्योगात तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे गरजेचे आहे. एआय आणि नॅनो टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने शेती अधिक शास्त्रशुद्ध, कमी खर्चिक आणि उत्पादनक्षम करता येईल. जर ऊस उत्पादन वाढले तरच शेतकऱ्यांच्या पदरात खरा नफा पडेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बंद पडलेला पण पुन्हा शेतकऱ्यांच्या मालकीत सुरू झालेला निळकंठेश्वर साखर कारखाना महाराष्ट्रातील पहिले उदाहरण आहे. आम्ही उसाला योग्य भाव देऊन हा कारखाना आदर्श बनविणार आहोत, असे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले. नॅचरल शुगरचे बी.बी. ठोंबरे यांनी, हा कारखाना सुरळीत चालवून शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती आणेल, असा विश्वास व्यक्त केला. कारखान्याला शासन पातळीवर आवश्यक ती मदत देण्याचे आश्वासन सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिले.
कार्यक्रमास राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार अभिमन्यू पवार, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार रमेश कराड, भाजप जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील, माजी खासदार सुधाकर शृंगारे, शिवाजी पाटील कव्हेकर, अर्चना पाटील चाकूरकर, बब्रुवान खंदाडे, सुरेश बिराजदार, संताजी चालुक्य, शिवाजी माने, बबन भोसले, परीक्षित पवार उपस्थित होते.












