बीड : ओंकार साखर कारखान्याच्या (वैद्यनाथ) द्वितीय बॉयलर अग्निप्रदिपन व गळीत हंगामाची सुरुवात पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते सोमवारी (ता. १०) करण्यात झाली. हा कारखाना यंदा दहा लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दिवंगत मुंडेंच्या काळात कोजनसाठी कर्ज घेतले व वेळेवर न दिल्यामुळे भरपूर व्याज लागलं. एमएससी बँकेचे कर्ज राजकीय परिस्थितीमुळे मिळू दिले नाही. नंतर इतर बँकांच्या कर्जामुळे कारखाना अडचणीत आला. त्यामुळे वैद्यनाथ कारखाना चालवायला देताना मनात प्रचंड वेदना झाल्या, असे म्हणाल्या.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी स्वतःची पदरमोड करून कारखान्यासाठी पैसे उपलब्ध केले. सरकारकडे कमी व्याजदराने पैसे देण्याची विनंती केली. सरकारने इतर कारखान्यांना पैसे दिले. मात्र माझ्या कारखान्याला दिले नाहीत. नंतर बँकांनी जप्तीची कारवाई केली, बँकेने किंमत ठरवून कारखान्याचा लिलाव केला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेणे भाग पडले. यावेळी ओंकारचे चेअरमन बाबूराव बोत्रे-पाटील, माजी आमदार केशव आंधळे, चंद्रकांत कराड, अजय मुंडे, वैद्यनाथ बँकेचे अध्यक्ष विनोद सामत, रमेश कराड, शिवाजी गुट्टे, योगेश्वरी शुगरचे चेअरमन रोहित देशमुख, वसंत राठोड आदी यावेळी उपस्थित होते.












