पुणे : सोमेश्वर साखर कारखान्याने हंगामासाठी केंद्र सरकारने एफआरपी प्रति टन ३,२८५ रुपये निश्चित केली आहे. मात्र सोमेश्वर कारखान्याने नेहमीच एफआरपीपेक्षा जास्त दर देण्याची परंपरा जपली आहे. उपमुख्यमंत्री आणि सोमेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची यशस्वी परंपरा यंदाही कायम राहणार आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. कारखान्याने यंत्राद्वारे केल्या जाणाऱ्या ऊस तोडणीस शेतकऱ्यांना आर्थिक मदत व प्रोत्साहन म्हणून यावर्षीही विशेष अनुदान योजना जाहीर केली आहे. २०२६-२०२७ हंगामात यंत्राद्वारे तोडणी केलेल्या ऊसास प्रति टन रु. ५० अतिरिक्त प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे.
कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप म्हणाले की, या वर्षीदेखील सभासदांना स्पर्धात्मक आणि उच्चांकी दर मिळेल. कार्यक्षेत्रात तोडणी, वाहतूक यंत्रणा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. ऊस जाळून तोडण्याची प्रथा टाळावी आणि यंत्राद्वारे तोडणी याचा अवलंब करावा. शेतकऱ्यांनी ऊस लागवड करताना पाच फुट सरीमध्ये लागण करावी. त्यामुळे यंत्राद्वारे तोडणी सोपी आणि कार्यक्षम होईल. कारखान्याकडे नोंदविलेला ऊस इतरत्र पाठवू नये. अन्यथा संबंधित सभासदांच्या कारखान्याच्या सवलती रद्द केल्या जातील. उशीराच्या ऊस तोडणीस फेब्रुवारीसाठी प्रतीटन १०० रुपये, मार्च महिन्यासाठी २०० रुपये आणि एप्रिल महिन्यासाठी प्रती टन ३०० रुपये अनुदान दिले जाईल अशी घोषणा त्यांनी केली.












