कोल्हापूर : हमिदवाडा येथील सदाशिवराव मंडलिक साखर कारखाना यंदा गळितास येणाऱ्या उसाला प्रतिटन ३५०० दर देणार आहे. त्यापैकी पहिला हप्ता ३४१० रुपये, तर उर्वरित रक्कम हंगाम समाप्तीनंतर संबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष संजय मंडलिक यांनी कारखाना कार्यस्थळावर आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
सदाशिवराव मंडलिक यांनी नेहमीच शेतकरी हिताचा विचार करून एफआरपीपेक्षा जादा ऊसदर देण्याची परंपराही कायम ठेवली तसेच, वेळोवेळी ऊसदर आंदोलनाची कोंडी फोडलेली होती. तर शेतकरी संघटनेच्या मागणीकडे सकारात्मक प्रतिसाद देत या हंगामातदेखील सुरुवातीस ३४१० दर जाहीर करून ऊसदराची कोंडी फोडण्याची परंपरा संजय मंडलिक यांनी कायम राखली आहे. यावेळी उपाध्यक्ष आनंदराव फराकटे, संचालक विश्वासराव कुराडे, नेताजी पाटील, संभाजी मोरे, तुकाराम ढोले, पुंडलिक पाटील, विष्णू बुवा, भगवान पाटील, कार्यकारी संचालक एन. वाय. पाटील, प्रताप मोरबाळे उपस्थित होते.












