पुणे : ओंकार शुगर उसाला जास्तीत जास्त बाजारभाव देणार असल्याचे प्रतिपादन ओंकार शुगर ग्रुपचे चेअरमन बाबूराव बोत्रे-पाटील यांनी केले. दौंड तालुक्यातील यवत येथील अनुराज शुगर साखर कारखाना हा ओंकार ग्रुपने घेतला आहे. या ओएसजी ग्रीन एनर्जी प्रा. लि. युनिट नंबर-१२ या कारखान्याच्या गळीत हंगामाचा प्रारंभ ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. यावेळी अनुराज शुगरचे डॉ. माणिक बोरकर, ओंकार शुगरच्या संचालिका रेखा बोत्रे, ओमराजे बोत्रे, दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पोपटराव ताकवणे, यवतचे उपसरपंच सुभाष यादव, कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक राजेश थोरात यांसह कारखान्याचे अधिकारी, कामगार तसेच ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाबूराव बोत्रे-पाटील म्हणाले की, आम्ही शेतकऱ्यास केंद्रबिंदू मानला आहे. सात वर्षांत आमच्याकडे कोणाचीही देणी नाहीत. उसाला चांगला बाजारभाव देणे हे आमचे कर्तव्य आहे. शेतकऱ्यांनी बाजारभावाची चिंता करू नये. या हंगामात साडेचार ते पाच लाख टन उसाचे गाळप करण्याचा संकल्प आहे. शेतकऱ्यांनी गाळपासाठी कारखान्याला जास्तीत जास्त ऊस द्यावा. डॉ. माणिक बोरकर म्हणाले की, काही कारणांमुळे अनुराज शुगर दोन वर्षे बंद राहिला. राजाराम बोरकर यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखाना उभारून जसे काम केले तसेच बोत्रे पाटील काम करतील. दोन वर्षे बंद असलेला साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय बाबूराव बोत्रे-पाटील यांनी घेतला आहे. ते शेतकऱ्यांना नक्कीच न्याय देतील,असा विश्वास राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केला.












