बीड : माजलगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक पद्धतीने ऊस लागवडीला प्राधान्य दिले. बेण्याऐवजी रोपांच्या लागवडीकडे कल वाढला आहे. तालुका परिसरातील जय महेश, लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी, छत्रपती सहकारी साखर कारखान्यासह छोटी- मोठी गुऱ्हाळे, गूळ पावडर निर्मिती कारखाने आहेत. त्यामुळे अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लागला आहे. पवारवाडी येथील खासगी तत्त्वावरील जय महेश कारखान्याने उसाच्या रोपाचे वाटप केले. कारखान्याच्यावतीने शेतकऱ्यांना पीडीएन : १५०१२, पीडीएन : १३००७ , पीडीएन : १५००६ आणि कोक : ८६०३२ ही रोपे पुरविण्यात आली आहे. ५० टक्के उधारीवर पुरविण्यात आलेली ही रोपे शेतकऱ्यांना दिलासादायक ठरली आहेत. उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असलेल्या ऊस रोपांची साडेपाचशे एकरवर लागवड झाली आहे.
ऊस लागवडीबद्दल शेतकरी सांगतात की, यंदा खरिपात झालेल्या अतिवृष्टीने खरीप हंगाम पुरता हातचा गेला. परिणामी केलेला खर्च निघाला नाही. रब्बी पेरणीसाठी अनुदानाची केलेली घोषणा कागदोपत्रीच आहे. त्यामुळे रब्बीची पेरणी कशी करावी हा प्रश्न आहे. घळाटवाडी येथील शेतकरी प्रकाश जाधव यांनी जय महेश साखर कारखान्याने दिलेली उसाची रोपे दिलासादायक ठरत आहेत असे सांगितले. जय महेश कारखान्याचे जनरल मॅनेजर पारसनाथ जैस्वाल म्हणाले की, सप्टेंबर व ऑक्टोबर रोपांचे वाटप केले. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव प्रमाणिक बेणे आणून रोपवाटिकेत आधुनिक पद्धतीने रोप तयार करण्यात आले आहे. तीन लाखांहून अधिक रोपे बांधावर पोच केले आहेत. अर्धी किंमत घेतलेली असून अर्धी किंमत पुढील वर्षी ऊस गाळप केल्यानंतर कपात केली जाणार आहे.












