सोलापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा मल्टिस्टेट विश्वराज महाडिक सहकारी साखर कारखान्याने गेल्यावर्षीच्या गळीत हंगामात खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली गळितास आलेल्या उसाचा २ हजार ८०० रु. प्रतिटन असा दर जाहीर केला होता. वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अतिरिक्त ५० रु. प्रतिटन देण्याचे वचन दिले होते. ज्या शेतकऱ्यांची ऊस बिले हंगामाच्या अखेरीस प्रलंबित होती, त्यांना अतिरिक्त ५० रु. प्रतिटन असे एकूण १०० दरवाढीचा लाभ दिला आहे अशी माहिती कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांनी दिली. गळीत हंगाम २०२४-२५ मधील उसाचे प्रतिटन २,९०० रुपयांप्रमाणे बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहे. यंदाही तालुक्यात सर्वाधिक दराची परंपरा जपली जाईल असा विश्वास चेअरमन विश्वराज महाडिक यांनी व्यक्त केला.
चेअरमन महाडिक म्हणाले की, खासदार महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शेतकऱ्यांच्या हिताला नेहमीच प्राधान्य देत आलो आहोत. कुठलीही उपपदार्थ निर्मिती नसताना इतर कारखान्यापेक्षा जास्त ऊस दर देण्याची आमची परंपरा आम्ही यंदाही कायम ठेवली आहे. गेल्यावर्षी ३० नोव्हेंबर ते १५ जानेवारी या कालावधीतील उसास अतिरिक्त ५० रु. प्रतिटन व ता १६ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीतील उसास अतिरिक्त १०० रु. प्रतिटनाप्रमाणे खात्यात जमा करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे कारखान्यावरील विश्वास दृढ झाला आहे.











