सांगली : राज्यातील साखर कारखान्यांनी गेल्या २०२४-२५ गळीत हंगामातील उसाला गुजरातप्रमाणे प्रतिटन ३,६५० रुपये दर द्यावा, अशी मागणी ऊस दर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे संजय कोले यांनी केली. साखर कारखान्यांनी अंतिम दर जास्त देण्यावर भर देण्याची मागणी त्यांनी केली आहे. ऊस नियंत्रण आदेशानुसार शेतकरी व कारखाना यांच्यात करार झाला असेल तर करारात ठरल्याप्रमाणे उसाचे पैसे द्यावेत. करार झाला नसेल तर एफआरपीप्रमाणे पहिली उचल द्यायची आहे. मात्र, हंगामाचा अंतिम दर शेतकऱ्यांना जादा मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
याबाबत कोले यांनी निवेदनात म्हटले आहे की, काही संघटनांनी ऊसदराची मागणी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. कारखाना चालकांनी पहिली उचल जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. गेल्या काही वर्षांपासून राज्यातील साखर कारखान्यांनी ज्या-त्या हंगामाचा दर धरावा, अशी मागणी केल्याने सरकारने कारखान्यांच्या मागणीला मान्यता दिली. परंतु त्यामुळे पहिल्या उचलीवळी एकरकमी एफआरपी मिळत नव्हती. ऊस कारखान्याला गाळपाला दिल्यावर १४ दिवसांत पहिली उचल द्यावी असा आदेश उच्च न्यायालयाने केला आहे. तेव्हा, एकरकमी एफआरपी देणे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देण्यासाठी प्रयत्न केले जाण्याची गरज आहे, असे संजय कोले यांनी निवेदनात म्हटले आहे.












