सोलापूर : आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केलेल्या मदतीमुळे सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या २०० कोटींच्या कर्जास राज्य सरकारने थकहमी दिली आहे. कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी ही माहिती दिली. कारखान्याच्या कर्जाला राज्य सरकारकडून थकहमी मिळत नसल्याने मोठा संघर्ष करावा लागत होता. मात्र, भाजप आमदार कल्याणशेट्टी यांच्यासह राज्य सरकारने मदत केली आहे असे सांगत त्यांनी दोघांचेही आभार मानले. मंगळवारी (ता. ११) कारखान्याच्या गाळप हंगाम प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. कारखान्याने नेहमीच सभासदांच्या उसाला सर्वाधिक दर दिला आहे. या आधीच्या सर्व हंगामांत इतर कारखान्यांच्या तुलनेत प्रतिटन १०० ते ४०० रुपये जादा दर देण्याची परंपरा जोपासली आहे. या हंगामातही अन्य कारखान्यांच्या तुलनेत चांगला दर देण्याची ग्वाही दिली.
काडादी म्हणाले की, गेल्या हंगामात केवळ पावणेतीन लाख टन ऊस गाळप झाल्याने बिलाला विलंब झाला. मात्र, यंदा तसे होऊ नये याची दक्षता घेतली आहे. कारखान्यावर मोठे कर्ज नाही. तांत्रिक अडचणींमुळे उशीर झाला आहे. गेल्यावेळी गाळप कमी झाल्याने अडचणी निर्माण झाल्या. यंदा तसे होऊ नये यासाठी नियोजन केले आहे. सुरुवातीला आडसालीसह नोंदवलेला संपूर्ण ऊस कारखान्यात यायला हवा. ऊस इतरत्र न नेता आपल्या कारखान्यालाच देणे ही सभासदांची जबाबदारी आहे. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष अण्णाराज ऊर्फ पुष्पराज काडादी, उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते, संचालक गुरुराज माळगे, शिवशंकर बिराजदार, सुरेश झळकी, राजशेखर पाटील, मल्लिकार्जुन बिराजदार, विद्यासागर मुलगे, अरुण लातुरे, सिद्धाराम व्हनमाने, शिवानंद बगले, अशोक पाटील, शंकर पाटील, काशिनाथ कोडते, हरिश्चंद्र आवताडे, महादेव जम्मा, कार्यकारी संचालक समीर सलगर आदी उपस्थित होते.

















